Labels

Monday, 28 April 2014

श्री महालक्ष्मी मंदिर,कोल्हापूर




महालक्ष्मी मंदिर पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.या देवस्थानाची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत गणना होते.
मुसलमानांनी देवळाचा विध्वंस केला तेव्हा मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्याने लपवून ठेवली होती . पुढे



छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ .. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले . त्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा .

महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले हे निश्‍चितपणे सांगता येत नसले तरी ख्रिस्तोस्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे महात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते. कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्‍त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.

काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर -चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे . देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात . या उलट जैन पंथियांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले . मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ .. १७२२ मध्ये दुसऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली . ही प्रतिष्ठापना करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सिधोजी हिंदूराव घोरपडेला पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते . हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे . प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे . देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे . पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर , पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत . उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते . या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात . देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत . पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत . महालक्ष्मीची मूर्ती .२२ मीटर उंच असून ती एका ० .९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे . देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात . आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.

प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होवू नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.

देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाण्याऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखी मध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.

No comments:

Post a Comment